राहुल गांधी सध्या भगवद्गीता आणि उपनिषद वाचत आहे असे ऐकले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की भारतीय जनता पार्टीला खरा भारत माहीत नाही. म्हणजेच खरा भारत काय आहे हे ज्ञान सध्या त्यांना उपनिषदातून मिळत आहे. भारतात गीता आणि उपनिषद यांना स्थान आहे हे मान्य करणे हे सुद्धा राहुल गांधींच्या दृष्टीने महत्वाचे आहे, कारण इतरांसाठी याबाबत काही शंका कधी नव्हती आणि नसणार आहे. भगवद्गीता, उपनिषद आणि असे अनेक धर्म हिंदू धर्मग्रंथ आहेत ज्यात अनेक प्रश्नाची उत्तर हिंदू धर्मीय शोधत असतो. राहुल गांधींनी सुद्धा राजकारणातील प्रश्नांची उत्तर गीता आणि उपनिषदामध्ये शोधण्याचे ठरवले असेल, प्रश्न हा आहे की असे विधान करण्याची का वेळ आली असेल राहुल गांधी वर? याचा विचार त्यांनी केलाही असेल पण आपल्यालाही करावा लागणार आहे. सध्याची टीव्ही वरचे वादविवाद पाहताना कॉंग्रेस च्या विचारसरणी मध्ये घडेलेले बदल (कदाचित ते वरकरणी असू शकतात) ठळकपणे दिसतात. त्यांचे प्रवक्ते आपल्या पाठीमागे हनुमान किंवा श्रीराम यांचे फोटो लावून बसलेले दिसत आहेत. कॉंग्रेस च्या फेसबूक पेज वर सध्या गीतेतील कृष्णाने सांगीतलेले विचार रोज सकाळी वाचायला मिळतिल. खरे तर आज पर्यन्त यांनी राम नाकारला होता, रामसेतू तर अस्तीत्वात नाही असेही यांचे म्हणणे आहे. आता कॉंग्रेस का बदलत आहे का बदलण्याचे नाटक करीत आहे? त्यासाठी 1970 च्या आधीची आणि आताची कॉंग्रेस यातील बदल पाहणे जरूरी ठरते.
भारताची फाळणी होण्याआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हंटले होते की इथे हिंदू आणि मुस्लिम अशी दोन राष्ट्रे राहतात. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि तेव्हापासून संघ हा भारतीय राजकारणाचा भाग बनून राहिला. त्यांचा भर हा हिंदूंचे एकत्रीकरण यावरच राहिला आहे आणि म्हणूनच संघातून आलेले नेते हिंदुन्च्या प्रश्नावर बोलत राहतात... पण हिंदू धर्म हा जाती आणि पंथामध्ये विभागला गेला असल्याने त्यांचे मत 'जात' म्हणूनच वापरले जाऊ लागले; 'हिंदू' म्हणून एकत्र येऊ दिले नये किंवा संघाच्या इतक्या प्रयत्ना नंतर सुद्धा होऊ शकले नाही.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर हिंदू धर्म म्हणजे 'किराणा' मालाचे दुकान आहे असे म्हंटले होते. साहजिकच या मालाची दाखल कॉंग्रेसला घ्यावी वाटली नाही. खरे तर फाळणीनंतर कॉंग्रेसची विचारधारा ही हिंदुत्वाकडेच झुकलेली होती आणि त्यातही नेहरू, पटेल, इंदिराजी, असे उच्च नेतृत्व कॉंग्रेस ला लाभलेली होती.. 1970 च्या दशकापासून या विचारसरणीला छेद गेला तो आजवर भरून आला नाही. तिथपासून धर्मनिरपेक्षता या शब्दाखाली इतर धर्मियांचे लांगूलचालन आणि हिंदू धर्मियामध्ये जातीवर फुट पाडून सत्ता मिळवणे हे गणित झाले होते. म्हणूनच काही थोर इतिहाकार असे म्हणतात की 'धर्मनिरपेक्षता' हा सर्वात चुकीने वापरला गेलेला शब्द आहे. नंतर कॉंग्रेस मध्ये फुट पडत गेली आणि खूप ठिकाणी क्षेत्रीय पक्ष बनत गेले. पण त्यांची विचारसारणी ही कायम तशीच राहिलेली आहे. अश्या पक्षाच्या उदयामुळे स्वबळावर सत्ता येणे कठीण होते गेले आणि युतीचे राजकारण सुरू झाले. माननीय शरद पवार मागे एकदा असे म्हणाले होते की पुढील काही दशकात कुठल्याही पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवणे कठीण आहे. राहुल गांधीनी तर 'जर भारत कम्प्युटर असेल तर कॉंग्रेस त्यातील डिफॉल्ट प्रोग्राम आहे' असे सांगून टाकले होते..
भारतीय जनता पार्टी मात्र कायम हिंदू विचारांचे भांडवल करण्यात अग्रेसर राहिली (प्रत्यक्षात ते सुद्धा कॉंग्रेस पेक्षा काही जास्ती वेगळे नाहीत). पण तरीही त्यांना एक हाती सत्ता मिळवता नाही आली. नरेंद्र मोदींच्या आक्रमक नेत्रत्वाने ते 2014 ला शक्य झाले आणि तिथून 'हिंदुत्ववादी' हा शब्द जास्त चर्चिला जावू लागला. तरीही कॉंग्रेसला आत्मपरिक्षण करावेसे वाटले नाही. पण आता जेव्हा एकामागून एक असे प्रत्येक राज्य कॉंग्रेस गमवत चालली आहे तेव्हा कॉंग्रेस कुठेतरी जागी झालेली दिसते. कॉंग्रेस ला सुद्धा आता बहुतेक असे वाटत आहे की हिंदू-विचारांचे जास्त खच्चीकरण करून आता चालणार नाही आणि म्हणून राहुल आजकाल कित्येक ठिकाणी मंदिरामध्ये जाताना दिसत आहेत. त्याउलट नरेंद्र मोदी मात्र आपली प्रतिमा विकासपुरुषाची दाखवण्यात अग्रेसर आहेत. पण ते करत असताना हिंदू आपल्यापासून दूरावला जावू नये म्हणून वेगवेगळे उपाय राखून आहेत. उदा. रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर यांचं सध्याच्या काळात फार महत्व वाढताना दिसत आहे. योगीना उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री करणे हा तर 'विरोधकांना सुद्धा दिवसा तारे दाखवण्यासारखी चाल होती'.
राहुल गांधीना नरेंद्र मोदी आणि संघ यांच्याशी लढायला गीता आणि उपनिषद वाचण्याची गरज खरच नाही आणि हे त्यांना ही माहीत असेलच. भाजप का जिंकत चालली आहे याचे बरेच कारणे त्यांना उमगलेले असतील, त्यावर विचारविनिमयही खूप झाला असेल. मागच्या 30 वर्ष्यामध्ये कॉंग्रेस ची प्रतिमा ही लांगूलचालनवादी आहे असा समज जनमानसामध्ये झालेला आहे आणि इतक्यात तरी त्यात काही बदल होईल असे दिसत नाही. त्यातच नेतृत्वाचा अभाव, अनिश्चित धोरण, आणि भ्रष्टाचारात अडकलेले अनेक नेते, अश्या विविध समस्याने ग्रासलेली कॉंग्रेस विचित्र परीस्थितीत अडकलेली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी विचारसरणीत करावे लागणारे बदल आणि कार्यकर्त्यांना निश्चित कार्यक्रम देण्यापलीकडे जाऊन उत्तर शोधावे लागेल. उदा. मागच्या निवडणुकीमध्ये गोवा आणि मणीपुर मध्ये कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरून सुद्धा बनवण्यात अपयश आले. याचा कुठेतरी कॉंग्रेस नेतृत्वाला गंभीरतेने विचार करावाच लागेल. ते होईल तेव्हा होईल, पण सध्या तरी राहुल गांधीनी भगवद्गीता आणि उपनिषद यामध्येच उत्तर शोधण्याचे ठरवलेले आहे असे दिसते. ते त्यांना मिळेल की नाही ते काळ ठरवेल, पण राहुल गांधींना असे बोलावे लागणे म्हणजे हा संघाच्या प्रयत्नाचा विजय समजले तरीही काही गैर ठरणार नाही.

No comments:
Post a Comment